पैठणमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहणाने शुभारंभ

Foto
आगामी शाही स्नानासाठी नाशिकच्या धर्तीवर भव्य नियोजन करणार : आ. विलास भुमरे

पैठण, (प्रतिनिधी): दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक उत्साहात तयारीचा शुभारंभ करण्यात आला. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावरील मोक्षघाट येथे ३१ फुटी भव्य ध्वजाचे ध्वजारोहण करून सिंहस्थ पर्वाची नांदी करण्यात आली.

द्वारी ठीक १२ वाजून २ मिनिटांनी आ. विलास भुमरे व वर्षा विलास भुमरे, नगराध्यक्ष विद्या भुषण कावसानकर, माजी नगरसेवक भूषण कावसानकर, रावसाहेब महाराज गोसावी, रघुनाथ महाराज पालखीवाले, बळीराम महाराज जोगस तसेच आयोजन समितीचे संयोजक पवन लोहिया व मान्यवरांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी कमलाकर शिवपुरी, दत्तागुरु पोहेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रोच्चार आणि जयघोषाच्या गजरात धार्मिक विधी व पूजाविधी केला. ध्वजारोहणाच्या वेळी संपूर्ण मोक्षघाट परिसर भक्तिमय
वातावरणाने दुमदुमून गेला होता.

याप्रसंगी बोलताना आमदार विलास भुमरे यांनी आगामी शाही स्नानाच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. पैठण येथे होणारे शाही स्नान नाशिकच्या धर्तीवर भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात येणार आहे. देशाच्या विविध भागांतून येणारे साधू महंत, संत महात्मे आणि लाखो भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर राहणार आहे. वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता, पाणीपुरवठा तसेच भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पैठण नगरी धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेली आहे. गोदावरीच्या तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पैठणच्या धार्मिक महात्म्याला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

मोक्षघाटावर फडकलेला ३१ फुटी ध्वज हा आगामी सिंहस्थ पर्वाच्या तयारीचा प्रतीकात्मक प्रारंभ ठरला असून, या सोहळ्यामुळे पैठणकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमास तहसीलदार ज्योती पवार, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र काळे, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, आयोजन समितीचे संयोजक पवन लोहिया, दिनेश पारिख, सर्व नगरसेवक, महाराज मंडळी, व्यापारी, विविध तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.